रविवार, दि. २३ अगस्त २०२०
दिवस दुसरा: आज ऋषिपंचमी !
आज रविवार, २३ ऑगस्ट ! आज उंदीरकी आहे. म्हणजे गणपतीचे वाहन उंदीर याची पूजा करावयाची आहे. तसेच ज्यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती पूजन असते, त्यांच्याकडील गणेशमूर्तींचे आज विसर्जन होणार आहे. गणपतीचे वाहन उंदीर कसे ? असा प्रश्न काही लोक विचारतात. गणेशपुराणात ‘ आखुवाहन ‘ असे म्हटले आहे.
‘ आखु’ या संस्कृत शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे माया, भ्रम आणि दुसरा अर्थ उंदीर ! माया म्हणजे
प्रेम-ममता नाही, तर विश्वाचा भ्रामक पसारा ! त्यावर विजय मिळविणे आवश्यक आहे. गणपतीने मोहमायेला वाहन बनवून , त्यावर नियंत्रण ठेवून ज्ञानप्राप्ती केली असा अर्थ निघतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. उंदीर शेतातील धान्याचे नुकसान करतो, गणपतीने त्याचे दमन करून त्याला नियंत्रणात ठेवले असाही अर्थ निघतो. तसेच उंदीर हे काळाचे प्रतिक मानले जाते. गणपती हा उंदीररूपी काळावर आरुढ झाला असेही मानले जाते. काही संशोधकांच्या मते मूषक म्हणजे अंधार, गणपती अंधारावर आरुढ होऊन सर्वत्र प्रकाश आणतो असेही समजले जाते.
यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. गणेशमूर्तींचे घरीच बादलीतील स्वच्छ पाण्यात विसर्जन करावे, किंवा घराबाहेर बादली ठेवून त्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन करावे. कृत्रिम तलावांचा वापर करावा.एक गोष्ट लक्षात ठेवावी आपण पृथ्वीचे मालक नसून पृथ्वीवर आलेले पाहुणे आहोत. त्यामुळे सण, उत्सव साजरे करतांना जलप्रदूषण, वायूप्रदूषण , ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ‘ यावर्षींची मूर्ती पुढच्यावर्षी विसर्जन करा ‘ असे जे सांगितले गेले ते योग्य नाही. बदलत्या तापमानामुळे मातीच्या मूर्तीला तडा जाऊ शकतो. म्हणून यावर्षींच्या मूर्तींचे याच वर्षी विसर्जन करावे.