सोमवार, दि. २४ अगस्त २०२०
दिवस तिसरा : आज सूर्यष्ठी !
आज सोमवार, २४ ऑगस्ट! आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस , कोरोना संकटातही यावर्षी आपण गणेशोत्सव साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. गणेश उपासनेत अथर्वशीर्ष या संस्कृत स्तोत्राला विशेष महत्त्व आहे. हे स्तोत्र एकदा, अकरा, एकवीस किंवा एक सहस्र वेळा म्हणण्याची पद्धत आहे.
थर्व म्हणजे हलणे, अस्थिर. अथर्व म्हणजे स्थिर. अथर्वशीर्ष म्हणजे बुद्धी स्थिर ठेवणारे. अथर्वशीर्ष पठनाने बुद्धी व मन स्थिर होऊन हाती घेतलेले शुभकार्य यशस्वी होण्यासाठी बल प्राप्त होते अशी उपासकांची श्रद्धा आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषींनी लिहिले आहे. हे स्तोत्र अथर्ववेदामध्ये समाविष्ट केलेले आहे. याच्या शेवटी
‘ इत्युपनिषद्’ असे म्हटले आहे. म्हणजे हे एक उपनिषद आहे. उपनिषदाचा विषय परब्रह्म असा असतो. म्हणून याचा प्रारंभ व शेवट ‘ ॐ भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा: ‘ या शान्तिमंत्राने करतात. शान्तिमंत्रानंतर ‘ ॐ स्वस्ति नऽ इंद्रोवृद्धश्रवा: ‘ या स्वस्तिमंत्राचे पठन करतात आणि त्यानंतर अथर्वशीर्ष पठनाला सुरुवात करतात. अथर्वशीर्ष स्तोत्रामध्ये एकूण १४ ऋचा आहेत. यापैकी सहा ऋचांमध्ये श्रीगणेशाच्या निर्गुण रूपाचे वर्णन आणि त्याचे श्रेष्ठ तत्त्व सांगितले आहे. सातव्या ऋचेमध्ये गणेशविद्या म्हणजे काय ते सांगितले आहे. आठव्या ऋचेमध्ये गणपतीची गायत्री सांगितलेली आहे. नवव्या ऋचेमध्ये गणेशाचे ध्यान करण्यासाठी त्याच्या सगुण रूपाचे वर्णन केले आहे. दहाव्या ऋचेमध्ये गणेशाच्या विविध नावांनी त्याला वंदन केले आहे. त्यानंतर अकरा ते चौदाव्या ऋचांमध्ये या स्तोत्राची फलश्रुती सांगितलेलीवआहे.
केवळ अथर्वशीर्ष पठनाने सर्व काही साध्य होणार नाही. त्यासाठी मनाची एकाग्रता साधणे आवश्यक असते. अथर्वशीर्ष पठनाने मनोबल वाढते, आत्मविश्वास वाढतो. कोणतेही काम लक्ष देऊन केले तर लक्ष्य गाठणे सुलभ होते.