गुरुवार, दि. २७ अगस्त २०२०
दिवस सहावा : आज गौरी विसर्जन !
आज गुरुवार, २७ ऑगस्ट, आज गौरीविसर्जन ! ज्येष्ठा गौरींचे विसर्जन हे मूळ नक्षत्रात करावयाचे असते. आज
दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनी चंद्र मूळ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आज दुपारी १२ वाजून ३६
मिनिटांनंतर कधीही गौरीविसर्जन करावयाचे आहे. ज्यांच्या घरी परंपरेप्रमाणे गौरींबरोबर गणेशमूर्तींचे विसर्जन
होते त्यांच्यासाठी आजचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे.
गौरी-गणेशमूर्तींचे विसर्जन , एका बाजूला वार्षिक कर्तव्य पार पाडल्याचे समाधान तर दुसर्या बाजूला गणपती
बाप्पा आपल्या मातेबरोबर आपल्या गावी जाणार म्हणून दु:ख ! यावर्षी कोरोनामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन घरातच
बादलीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात करावयाचे आहे किंवा कृत्रिम तलावात करावयाचे आहे. आपण पृथ्वीचे मालक
नसून पृथ्वीवर आलेले पाहुणे आहोत. सण-उत्सव साजरे करतांना जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची
काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे.
गणपती हा मातृभक्त होता. पद्मपुराणात याबद्दलची एक कथा आहे. एकदा सर्व देवांनी तयार केलेला अमृताचा
मोदक नारदमुनीनी पार्वतीला दिला. पार्वतीची दोन्ही मुले गणपती आणि स्कंद मोदकासाठी आपल्या आईकडे म्हणजे
पार्वतीकडे हट्ट करू लागले. पार्वती मुलांना म्हणाली “ हा मोदक खाणारा अमर होऊन सर्व विद्या, शास्त्र व कला
यामध्ये निपुण होईल. परंतू हा मोदक तुमच्यापैकी जो धार्मिक भावनेने सिद्धी प्राप्त करून अगोदर येईल त्यालाच मी
देईन. “ हे ऐकून स्कंद मोरावर बसून तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन सिद्धी प्राप्त करून घ्यायला निघाला. गणेशाने मात्र आई-
वडिलांची पूजा केली. त्यांना प्रदक्षिणा घातली आणि स्कंद येण्यापूर्वी पार्वतीपुढे हजर झाला. तीर्थयात्रा आटोपून
स्कंद आला. दोघेही मोदकासाठी हट्ट करू लागली. पार्वतीने गणेशाची प्रशंसा केली आणि
सांगितले-“ आई-वडिलांच्या पूजेचे पुण्य व सिद्धी ही इतर सिद्धींपेक्षा महान व श्रेष्ठ आहे. “ असे म्हणून पार्वतीने तो
मोदक गणेशास दिला. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणार्या आजच्या तरुणांसाठी ही गोष्ट नक्कीच बोधप्रद आहे .