शुक्रवार, दि. २८ अगस्त २०२०
दिवस सातवा : आज भागवत सप्ताहारंभ !
आज शुक्रवार, २८ ऑगस्ट आज गणेश उपासनेचा सातवा दिवस ! दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन होते, पूजन
करतो, आरती करतो, अथर्वशीर्ष पठन करतो. दरवर्षी हे दिवस मोठ्या उत्साहाचे असतात. आनंदाचे असतात.
भारतात विशेषत: महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
आज आपण गणपतीविषयक समज-गैरसमज समजून घेऊया.(१) उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो असा एक
गैरसमज आहे. गणेशाच्या डाव्या हातात मोदक किंवा लाडू असतो म्हणून गणेशाची सोंड डावीकडे असते. देव हा
कधीही कडक नसतो. तो कृपाळू असतो, क्षमाशील असतो. (२) गणपती जेथे घरचे देव असतात तेथेच आणायला
पाहिजे का ? तसे कुठेही लिहिलेले नाही. आपण जिथे राहतो, तेथे गणेशमूर्ती आणू शकतो. परदेशात गेलेले गणेश
उपासक तेथेही गणेशोत्सव साजरा करू शकतात. (३) गणेशोत्सव किती दिवस साजरा करायला पाहिजे ? त्याबद्दलही
शास्त्रात काहीही लिहिलेले नाही. हे प्रत्येकाच्या इच्छेवरच अवलंबून आहे. दिवसात बदल केला तरी चालतो. सुवेर,
सुतक किंवा इतर मोठी अडचण आली तर एखाद्यावर्षी खंड पडला तरीही चालतो. (४) वडिलांच्या मृत्यूनंतर मोठ्या
मुलानेच गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे का ? तसेही नाही. वडिलांनी सुरू केलेले व्रत पुढे मुलांनी पाळलेच
पाहिजे असे नाही. सर्व मुलांनी गणेशोत्सव साजरा केला तरी चालतो. किंवा नाही केला तरीही चालतो. (५) दरवर्षी
उंचीने वाढत जाणारी गणेशमूर्ती पुजायला पाहिजे का ? तसेही शास्त्रात कुठेही लिहिलेले नाही. गणेशमूर्ती मातीची व
छोटी असावी, श्रद्धा व भक्ती मोठी असावी. (६) गणेशोत्सव सुरू असतानाच जर मूर्तीला इजा झाली तर काय
करायचे ? मूर्ती ही मातीची असते. तिला इजा होऊ शकते. चिंता करायची नाही, गणपती हा क्षमाशील असतो.
ध्यानात येताच उत्तरपूजा व आरती करून गणेशमूर्तीचे विसर्जन करायचे. (७) गणेशपूजेसाठी सोवळे का पाळायचे ?
सोवळे म्हणजे स्वच्छता, पावित्र्य ! सध्या कोरोनामुळे आपण स्वच्छतेकडे जास्त लक्ष देतच आहोत. स्वच्छतेचे महत्त्व
सर्वांनाच पटले आहे. वातावरण पवित्र असावे हाच सोवळे पाळण्यामागचा मूळ उद्देश असतो. (८) गणेश कथा सत्य
आहेत का ? पुराणतली वानगी ( वांगी नव्हे ! ) पुराणात , असे आपण म्हणतो. कथांमागचा हेतू लक्षात घ्यावयास
हवा. उद्देश लक्षात घ्यावयास हवा असतो.