रविवार, दि. ३० अगस्त २०२०
दिवस नववा : आज वामन जयंती !
आज रविवार, ३० ऑगस्ट! गणेश स्थापनेनंतरचा आजचा नववा दिवस ! आरत्या झाल्यानंतर
आपण “ घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ॥ “ हे भजन म्हणतो. प्रत्येक आरतीची रचना
एकेकाच कवीने केलेली असते. परंतू या भजनाचे तसे नाही. या भजनातील पाचही कडवी वेगवेगळ्या ठिकाणांहून
घेतलेली असून प्रत्येक कडव्याची रचना ही वेगवेगळ्या कवींनी केलेली आहे. कदाचित कमी लोकांनाच हे माहीत
असेल.
‘ घालीन लोटांगण ‘ या पहिल्या कडव्याच्या चौथ्या ओळीत शेवटी ‘ म्हणे नामा ‘ आहे. त्यावरून पहिले कडवे
हे संत नामदेव ( इ. सन १२७०-१३५० ) यांचे आहे हे तुमच्या लक्षांत आलेच असेल. दुसरे ‘ त्वमेव माता पिता
त्वमेव ‘ हे कडव्याची रचना आद्य शंकराचार्यांची आहे.शंकराचार्यांचा काळ म्हणजे ७-८ शतकामधील आहे. त्यांच्या
गुरुस्तोत्रामधून ती रचना घेतली गेली आहे. तिसरे ‘ कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा ‘ हे कडवे श्रीमद्भागवत पुराणातील
आहे.श्रीमद्भागवत पुराणाचा काळ म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वींचा आहे. चौथे ‘ अच्युतं केशवं रामनारायणं ‘ हे
चौथे कडवे शंकराचार्यांच्या. ‘अच्युताष्टकम् ‘मधील आहे. आणि पाचवे कडवे ‘ हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ‘ हे
पाचवे कडवे इ. सनापूर्वी तीन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या कलिसन्तरण उपनिषदामधील आहे. भविष्यकालात आणखी
एखाद्या कवीची रचना या भजनाला सहावे कडवे म्हणून जोडले जावू शकते.
काही का असेना, पण गेली कित्येक वर्षे आरत्या म्हणून झाल्यावर शेवटी ‘ घालीन लोटांगण, वंदीन चरण ‘ हे
भजन म्हणण्याची प्रथा चालू आहे. आरत्या म्हणतांना वातावरण भक्तिमय झालेले असतेच. त्यानंतर म्हटल्या
जाणार्या या भजनाचा गोडवा देखील अवीट असाच आहे. त्यामुळे वातावरण अधिकच पवित्र बनते. तसेच आरत्यांचा
क्रम ठरवून जो नेतृत्व करीत असतो, त्याने या भजन म्हणायला प्रारंभ केला की आरत्या म्हणायच्या समाप्त झाल्या हे
सर्वांच्या लक्षात येते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरत्या आणि त्यानंतर म्हणावयाचे हे भजन यांचा ठेवा
जपला जातो. तसेच तो एका पिढीकडून दुसर्या पिढीला सुपूर्द केला जातो ही आनंदाची गोष्ट आहे.