Sep 17

शुक्रवार, दि. १७ सितंबर २०२१

दिवस आठवा : आज परिवर्तिनी एकादशी !

आज शुक्रवार,  १७ सितंबर, आज परिवर्तिनी एकादशी, गणेशस्थापनेनंतरचा आठवा दिवस ! सध्या
गणपतीबाप्पाच्या वास्तव्यामुळे सर्वत्र वातावरण प्रसन्न झाले आहे. कोरोनांमुळे आपल्या मनावर आलेला ताणतणाव
दूर झाला आहे. गणेशपूजेनंतर आपण दररोज आरत्या म्हणत असतो. आज आपण आरत्यासंबंधी अधिक माहिती
करून घेणार आहोत.
          प्रज्वलित निरांजन , पणती किंवा दिवा तबकात ठेवून त्याने देव किंवा गुरू यांना ओवाळण्याच्या विधीला
‘ आरती ‘ असे म्हणतात. आरती हा शब्द ‘ आरात्रिक ‘ या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. आरतीमध्ये त्या त्या
देवतेची स्तुती केलेली असते. तिच्याकडे मंगलाची आणि ऐश्वर्याची इच्छा प्रकट केलेली असते. मराठी भाषेच्या
आरंभापासून आरतीची रचना केलेली आढळते. इसवी सनाच्या बाराव्या शतकातील महानुभाव कवींनी आणि
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास या संतंनी आरत्या तयार केलेल्या आहेत. “ आरत्या म्हणजे मराठी
भाषेतील भक्तिरसप्रधान काव्यमंदिरातील स्वतंत्र देवघरं आहेत “ असे ल. रा. पांगारकर यांनी म्हटले आहे. विशेष

म्हणजे शेख महंमद या मुसलमान कवीनेही आरत्या रचल्या आहेत. आरतीची रचना करणाराचे नाव शेवटच्या
ओळीत गुंफलेले असते.
        आरत्या म्हणतांना त्या ओरडून म्हणू नयेत. त्या शांत व मधुर आवाजात म्हणाव्यात. आरती ऐकणाराला
प्रसन्नता वाटली पाहिजे. आरतीमधील आर्त भाव जर प्रकट झाला नाही तर ती आरती कशी होईल ?
‘ सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची “ ही समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली आरती  आपण अगदी सर्वप्रथम म्हणत
असतो. त्यामुळे ती आरती सर्वांच्या पाठ झालेली आहे. आरती म्हणताना ती शुद्ध म्हणावी. तरच ती जास्त श्राव्य व
अर्थपूर्ण होते. प्रत्येक आरतीच्या रचनाकाराचे नाव लक्षात ठेवावे. श्रावण महिन्यात वाचल्या जाणार्या कहाण्या हे
प्राचीन वाड्.मय जतन करायला पाहिजे. गणेशोत्सवामुळे आरत्या या पुढच्या पीढीपर्यत पोहोचत आहेत ही
समाधानाची गोष्ट आहे.