थेऊरचा चिंतामणी

“मुळा-मुठा नदीच्या किनारी वसलेल्या थेऊरचा (ता.उहवेली) चिंतामणी हा अष्टविनायकातील पाचवा गणपती. द्वापारयुगात येथील ऋषींच्या तपामध्ये काही असुर व्यत्यय आणत होते. या वेळी त्यांनी गणपतीची आराधना केली. गणरायाने तेथे प्रकट होऊन असुरांचा वध केला आणि ऋषींचे संकट दूर केले. त्यांची चिंता मिटली. यावरून येथील गणपतीला चिंतामणी असे नाव मिळाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. गणेशोत्सवाच्या काळात भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये येथे मोठी यात्रा भरते.थेऊरमध्ये कोणीही घरी गणपतीची प्रतिष्ठापना करत नाही. सर्व जण मंदिरातील चिंतामणीचीच उपासना, पूजा-अर्चना करतात. द्वारयात्रेच्या काळात चारही दिशांना देवाची मिरवणूक काढली जाते. या वेळी गावकरी, पुजारी, मानकरी आदी भक्त यामध्ये सहभागी होतात. गणेश चतुर्थीला पहाटेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत पुजाऱ्यांकडून मंदिरात पूजा, अभिषेक सुरू असतो. यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले असते. चिंतामणीला वर्षभरासाठी बारा महिन्यांचे वेगवेगळे पोषाख आहेत. गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात येत असल्याने या महिन्याचा पोषाख श्रींना घातला जातो. पैठणी काठाचे वस्त्र आणि ऐतिहासिक अलंकारांनी गणेशाला मढवले जाते. तसेच, पुणेरी फेय, पगडी, मुकुट,रुद्राक्षांची माळ, दुर्वा, केवडा, जास्वंदाच्या फुलांची आकर्षक आरास केली जाते. गाभाऱ्याला फलांची सजावट केली जाते. वर्षातून फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्रींना तुळस वाहिली जाते. इतर दिवशी दुवा वाहिल्या जातात. त्रिकाल पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविला जातो. रात्रीच्या वेळी छबिन्याचे आयोजन केले जाते. यामध्ये रात्रभर जागर करून गणरायाची आराधना केलीजाते. तसेच, भाद्रपद पौर्णिमेला गणेशयागाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी सर्वांसाठी महाप्रसाद असतो.गावकरीही दहा दिवस मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.

(संकलन : अभिजित बारभाई)

 

पुण्यापासूनचे अंतर

30 पुण्याहून सोलापूर महामार्गाने किमी/ हडपसरमार्गे थेऊर फाटा

मंदिराविषयी थोडक्यात

थेऊर येथील चिंतामणी मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांच्या काळात केल्याचे सांगितले जाते. पेशव्यांनी तेथे भव्य सभागृह बांधले आहे. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळेच्या दोन मोठ्या घंय मिळाल्या होत्या. त्यापैकी एक घंय येथील मंदिरात आहे. चिंतामणीची मूर्ती स्वयंभू असून, डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांत लाल मणी व हिरे आहेत. माधवराव पेशवे यांची गणपतीवर अपार श्रद्धा होती. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.