ढोल्या गणपतीची प्रतिकृती
‘ओंकारप्रधान रूप गणेशाचे’ असे म्हटले जाते… बाप्पा कुठल्याही रूपात आपल्यासमोर यावा आणि त्याची प्रतिमा आपल्या मनात घर करून जावी, असे वारंवार घडते. अवचित कुठेतरी पाहिलेले एखादे गणेशरूप सतत आठवत राहते.साताऱ्यातील वाई या प्रसिद्ध गावी कृष्णा नदीच्या काठावरचे गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. ढोल्या गणपती म्हणून येथील गणरायांचे भव्यदिव्य रूप ओळखले जाते. याच ढोल्या गणपतीची प्रतिकृती वाई परिसरातील मेणवली या ऐतिहासिक गावी आहे.कृष्णाकाठचेच मेणवली पूर्वापार प्रसिद्ध आहे, ते येथे पेशवाईतले मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी बांधलेला वाडा आणि नदीवरच्या सुंदर घाटासाठी. मेणवलीत नाना वाड्यात प्रवेश केल्यावर वाड्याच्या मुख्य चौकात डाव्या बाजूलाच भिंतीलगतच्या चौथऱ्यावरची गणेशमूर्ती आपले लक्ष वेधून घेते आणि आपल्याला वाईला पाहिलेले बाप्पाचे भव्य रूप आठवून जाते. बाप्पाची अगदी हुबेहूब प्रतिकृती म्हणतायेईल, असे हे गणेशरूप लोभस आहे. ते पाहताक्षणी ‘लंबोदर’ या त्याच्या नावाचा आठव नाही झाला, तरचनवल! या चतुर्भुज मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या उजव्या हातात प्रसाद आहे. एरवी बहुतांश गणेशमूर्तीचा उजवा हात आशीर्वचन देणारा असतो. येथे बाप्पाच्या हातात प्रसाद आहे. डावीकडच्या हातावर बाप्पाची सोंड असून, मागील दोन्ही हातात शस्त्रे आहेत. बाप्पाचा मुकुटही वैशिष्ट्यपूर्ण असून, तो एखाद्या गोल टोपीप्रमाणे दिसतो. बाप्पाच्या पायांत वाळे आहेत. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या दोन्ही पायांत दोन आणि डावीकडच्या पायामागेएक असे तीन मूषक बाप्पाच्यासोबतीला येथे पाहायला मिळतात. नाना वाड्यात ही मूर्ती येथेच काआहे, ती पूर्वी कोनाड्यात, कीमंदिरात होती, ही प्रतिकृती नेमकी केव्हा, कशी आणि कुणी बनवून घेतली, या प्रश्नांची उत्तरे मिळत नसली, तरी बाप्पाचे हे अवचित भेटलेले रूप आपल्याला सुखावून जाते. वाई परिसरात गेलात, तर मेणवलीला आणि येथूनच जवळ असलेल्या धोम येथीलही सुंदर मंदिराला आवर्जून भेट द्या.