गणपती गडद
गणपती गडद… नावातच या ठिकाणाचे वैशिष्ट्यदडले आहे. गडद म्हणजे कातळातली गुहा किंवा गुफा. गणरायाच्या नावानेच ‘गणपती गडद’ हे ठाणे दुर्गम जागी भटकंती करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या निसर्गरम्य ठिकाणी जायचे, तर तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तिथून मुरबाड तालुका आणि या तालुक्यातील सोनावळे या सुंदर गावी जावे लागेल. कल्याण ते मुरबाड हे अंतर साधारण २७ किलोमीटर आहे.स्वतःचे वाहनअसल्यास उत्तम. नसेल, तरी कल्याणते मुरबाड अशी एसटी सेवा उत्तम आहे. तिथून खासगी वाहनांनी सोनावळे गाठता येते. माळशेज घाटमार्गेही या ठिकाणी जाता येते. त्यासाठी सरळगाव, उमरोली, धसई आणि सोनावळे असा प्रवास करावा लागतो. यासह मुरबाडहून म्हसा जंक्शन आणि तिथुन धसई हा मार्गही आहे. सोनावळे हे गडदेच्या पायथ्याचे गाव. कातळ । पहाडातले हे ठिकाण दूरवरूनपाहताना कातळात कोरलेले झरोके दुरून खिडक्यांसारखे दिसतात.सोनावळ्यातून निसर्गाच्या कुशीतून गणपती गडद गाठताना आपण त्या वातावरणात रमून जातो. हा छोटा ट्रेक आपण गडदेत पोहोचतो,तेव्हा येथे आल्याचे सार्थक घडवतो. पावसाळ्याच्या या दिवसांत लेण्यांच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे पाण्याची एक चादरच गडदेसमोर पाहायला मिळते. या कातळगुहेत बाप्पाच्या दोन प्राचीनमूर्ती आणि आता नव्याने ठेवलेल्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात. ढाकोबा, दुर्ग या रांगेतले हे ठिकाण आहे. बाप्पाचे दर्शन घेऊन येथे विसावताना तुमचे मन या कातळलेण्यात हरवून जाते. गणपती गडदसह तुम्ही गोरख-मच्छींद्रगड (देहरी गाव), सिद्धगड़ (उचले गाव) किंवा अहुपे घाटपायथा यांपैकी कोणत्याही जोडट्रेकचे नियोजन करू शकता. गडदेतला बाप्पा पाहताना, सभोवतीच्या निसर्गातच जणू बाप्पाचे मनोहारी रूप दडल्याची जाणीव होते आणि या पर्यावरणात असणाऱ्या दैवताला जपण्याची जाणीवहीदृढ होते. (संकलन: प्रसाद पवार)