Nrtya Ganesh Halebidu

नृत्तगणेश  

गणपतीचे महत्व जसजसे वाढत होते तसे त्याचे भक्त त्याला विविध रूपात पाहू होते. वैनायकी, शक्ति गणेश यांसोबतच मंदिरांवर एक गणपतीचे एक वेगळे रूप दिसू लागले ते म्हणजे ‘नृत्तगणेश’. शिवमंदिरामध्ये गणपतीचा समावेश होऊ लागला आणि मंदिरांच्या बाहेरील भिंतींवर शिव परिवारातीलविविध देवता दाखवताना त्यात गणेशाचाही समावेश करण्यात आला. त्याच्या केवळ बसलेल्या अथवा उभ्या मूर्तीखेरीज जास्त लय असलेली हि नृत्तगणेशाची मूर्ती होती. ‘क्रियाक्रमदयोत’ या प्राचीन ग्रंथानुसार या नृत्तगणेशाच्या आठ हातात पाश, अंकुश, मोदकपात्र, कुठार, अक्षमाला, सर्प, इ. दाखवावेत व त्याचा एक हात मोकळा असावा. म्हणजे शिल्पकाराला त्याच्या कल्पनेप्रमाणे नृत्यातील हस्तप्रकारांचा वापर करता येऊ शकतो.  हा नृत्तगणेश कमलासनावर उभा असलेला दाखवला जातो. त्याचा डावा पाय कमळावर ठेवलेले असतो व तो गुढग्यात किंचित वाकलेला असतो. त्याचा उजवापाय नृत्य करण्यासाठी वर उचलेलला असतो. 

नृत्तगणेशाच्या  विविध प्रतिमा मुख्यतः मंदिराच्या बाह्यभागावर आढळतात. बंगालमध्ये सापडलेल्या पाल राजांच्या काळातील अष्टभुज नृत्तगणेश या उंदरावर उभा असून त्याच्या आजूबाजूला झाजवादक व मृदंगवादक उभे आहेत तर हिमाचल प्रदेशात मिळालेल्या एका प्रतिमेत हातात घंटाघेऊन सर्पावर नाचणारा चतुर्भुज नृत्तगणेश आहे.

खजुराहो येथील कंदरीय महादेव मंदिरातील नृत्तगणेश असाच मनोरम आहे. या देवळाच्या देवकोष्ठातील ही मूर्ती त्रिभंग अवस्थेतील असून सहा हातांची आहे. गणेशाने हातात पाश, अंकुश, सर्प, मोदक इत्यादी धारण केले असून त्याचा एक हात मांडीवर आहे. त्याच्या शेजारी दोन गण वीणा आणिमृदंग वाजवत असून त्याचे हे नृत्य बघण्यासाठी गंधर्वांनी दाटी केली आहे. 

कनौज (उत्तरप्रदेश) येथे सापडलेल्या प्रतिहार काळातील  नृत्तगणेशाच्या प्रतिमेच्या चौकटीत बाजूला शिव, मातृका, दुर्गा,कृष्ण, वाराही इ. देवता दाखवल्या आहेत. तर फतेहगड (उत्तरप्रदेश) येथील चित्रगुप्त मंदिरातील अष्टभुज नृत्तगणेशाच्या पायाशी साथीदार बसले आहेत.या गणपतीच्या उजव्या व डाव्या बाजूला गजलक्ष्मी, सरस्वती, कौशिकी, शरसंधान करणारी दुर्गा आणि मातृका यांचे अंकन आहे. इतक्या देवता आजूबाजूला असणारी अशी ही  नृत्तगणेशाची मूर्ती दुर्मिळ आहे. 

नृत्तगणेश हा फक्त उत्तर भारतातच प्रसिद्ध होता असे नाही तर दक्षिण भारतात देखील त्याच्या मूर्ती आढळतात. कर्नाटकातील हळेबिडू येथील होयसाळांच्या काळातील मंदिराच्या बाह्य भागावर अत्यंत बारीक कलाकुसर केलेले नृत्तगणेश दाखवण्यात आलेले आहेत. सालंकृत गणेशाच्या यामूर्तीमध्ये गणेशाच्या मस्तकावर छत्रही दाखवण्यात आले आहे. 

अशी ही शिवाच्या नटराज रूपाजवळ जाणारी नृत्तगणेशाची संकल्पना आणि प्रतिमा विशेष मानली पाहिजे.