Skakti Ganesh

शक्तिगणेश 

इसवी सनाच्या ९व्या/१०व्या शतकापासून गणपतीचे महत्व वाढू लागले होते हे शिलालेख, मंदिरे इ. भौतिक पुराव्यावरून आपल्याला दिसते तसेच ते विविध पुराणातूनही दिसते. यापूर्वीच शैव, वैष्णव शाक्त व सौर हे पंथ उदयाला आले होते. गणपती शिवपरिवार देवता म्हणून गणला गेलाअसला तरी १०व्या शतकापासून त्याचा स्वतंत्र पंथ ‘गाणपत्य पंथ’ उदयाला येत असलेला आढळतो. या प्रत्येक पंथात तिची प्रमुख देवता सर्वोच्च मानली  आहे. याच गाणपत्य पंथाची पुराणे म्हणजे गणेश पुराण आणि मुद्गल पुराण. या पुराणांची रचना साधारणपणे १२ व्या ते १४ व्या शतकातझाली असावी असे संशोधकांचे मत आहे. या पुराणांनुसार गणेशाचे विविध अवतार मानले गेले आहेत. तसेच त्याच्या विविध असुरांबरोबरच्या युद्धाच्या पराक्रमकथाहि या पुराणांमध्ये आहेत. 

अशा रीतीने गणेशाची एका स्वतंत्र देवता स्वरूपात उपासना होत असताना त्याला इतर देवांप्रमाणेच त्याच्या शक्तीसह दाखवण्यात येऊ लागले. शैव पंथातील शिवपार्वती किंवा वैष्णव पंथातील लक्ष्मीनारायण यांच्या एकत्र मूर्तींप्रमाणेच गणेशाची त्याच्या शक्तीसह मूर्ती घडवण्यातयेऊ लागली. या मूर्तींना शक्तिगणेश असे संबोधले जाते. गणेशाच्या लक्ष्मीगणेश, महागणपती, उच्छीष्ठगणपती, ऊर्ध्वगणपती आणि पिंगल गणपती या मूर्तींचा समावेश शक्तिगणेश या संकल्पनेमध्ये करतात.  

शक्तिगणेशाच्या मूर्ती कमी आढळतात. लखनऊ, झाशी व भोपाळ येथील संग्रहालयांमध्ये शक्तिगणेशाच्या काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. झाशी येथील संग्रहालयातील शक्तिगणेशाच्या एका मूर्तीतील गणेश चार हातांचा असून त्याच्या शक्तीला दोन हात दाखवले आहेत. त्यांच्या हातात परशु, लाडू, कमळ दाखवलेले आहे. पुणे येथील त्रिशुंड गणपतीची मूर्ती ही शक्तिगणेशाची आहे. येथील सहा हातांच्या गणपतीच्या मांडीवर त्याची शक्ती स्त्री रूपात दाखवलेली आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की जरी वैनायकी हि गणेशाची शक्ती म्हणून स्वतंत्रपणे मूर्तिरूपात दाखवलेली असलीतरी देखील शक्तिगणेश या स्वरूपामध्ये शक्तीला गजमुख दाखवण्यात येत नाही.   

मंदसोर जवळ सापडलेली १०व्या शतकातील शक्तिगणेशाची सुंदर मूर्ती भोपाळ येथील संग्रहालयात ठेवलेली आहे. या मूर्तीतील गणेश व शक्ती उभे असून त्यांच्या आजूबाजूला गण दाखवलेले आहेत. यातील गणेश हा चतुर्हस्त असून त्याच्या हातातील परशु दिसतो. मात्र शक्तिची मूर्ती दोनहातांची दाखवलेली आहे. या दोन्ही मूर्ती सालंकृत आहेत. 

दहा हातांचा व पाच सोंडांचा गणपती हे महागणपतीचे लक्षण आहे. विशेषतः भारताच्या पूर्व भागात या मूर्ती मिळाल्या आहेत. पाल राजांच्या काळातील महागणपतीची मूर्ती विशेष नमूद करण्यासारखी आहे. यातील गणपतीच्या हातात गदा, त्रिशूल, चक्र, सर्प, कमळ, इ. दाखवले असून सिंहासनाच्याखाली हत्ती व उंदीरहि दाखवलेले आहेत. या महागणपतीच्या डाव्या मांडीवर शक्ती बसलेली आहे. 

अशा पद्धतीने महागणपतीच्या शेजारी जर लक्ष्मी हि शक्ती म्हणून दाखवलेली असेल तर त्यास लक्ष्मीगणेश असे म्हणतात. कोणार्क येथून अशी लक्ष्मीगणेशची प्रतिमा प्राप्त झाली आहे. यामूर्तीतील लक्ष्मीच्या हातात कमळ दाखवलेले आहे. 

अशा ह्या शक्तिगणेशाची उपासनाइच्छीतगोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी केली जाते. 

——-