Trishundi Ganapati

‘मानव गृह्यसूत्र’ या प्राचीन ग्रंथात सांगितल्याप्रमाणे विनायकांनी मनुष्याला ग्रासले तर विविध बाधा निर्माण होतात, दुःस्वप्ने पडतात त्यामुळे या विनायकांची शांति करावी आणि गावातील, नगरातील चौकांत त्यांना नैवद्य दाखवावा. यातूनच कार्यातील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी या विनायकांची पूजा करण्याचा प्रघात पडलाआणि गणेशाची प्रथम पूजा केली जाऊ लागली.             

इ. स. पूर्व चौथ्या शतकापासून प्राचीन भारतातील शिव, विष्णु, वासुदेव, संकर्षण, दुर्गा, कार्तिकेय, सूर्य, इत्यादी देवतांच्या मूर्तीपूजनाचे, त्यांच्या मंदिरांचे उल्लेख प्राचीन साहित्य, शिलालेख आणि नाणी यांच्या पुराव्यांवरून मिळतात. अर्थात या काळात विघ्न हरण करण्यासाठी विनायकांची पूजा होत असली तरी त्याचे कोणतेही पुरावे आढळत नाहीत. वरील देवतांच्या तुलनेत जवळजवळ सहाशे वर्षांनी गणपतीच्या मूर्ती, त्याच्या स्वतंत्र पूजनाचे पुरावे इ. स. तिसऱ्या-चौथ्या शतकात सापडतात.

विविध कारणांसाठी पूजा केली जाणाऱ्या गणेशाच्या मूर्ती इ. स. पाचव्या शतकापासून मंदिरांवर, लेण्यांमध्ये दिसू लागतात. तो विघ्नहर्ता, रक्षणकर्ता तर होताच पण शेतकऱ्यांसाठी सुगीची देवता तर  विद्यार्थ्यांसाठी बुद्धीची देवता म्हणूनही तो पुजला जाऊ लागला. नगरद्वाराजवळील, व्यापारीमार्गावरील विघ्नहर्त्याची छोटेखानी मंदिरे ही तांडे घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी महत्वाची पूजास्थाने बनली. पश्चिम महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन ती सातवाहनकाळापासून ते मध्यायुगापर्यंत वापरात असलेल्या व्यापारी मार्गांवर वसलेली आहेत, हे ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. म. न. देशपांडे यांनी सप्रमाण दाखवून दिले होते. या मार्गांवरून जाणाऱ्या  व्यापाऱ्यांकडून विघ्नहरणासाठी या ठिकाणी असलेल्या यक्षांची अथवा विनायकांची पूजा होत असावी आणि अठराव्या शतकात गाणपत्य पंथाच्या प्रभावामुळे  या ठिकाणी मंदिरे बांधली गेली किंवा येथील प्राचीन छोटेखानी मंदिरांचे जीर्णोद्धार झाले हे तत्कालीन नोंदींवरून लक्षात येते. यांना अष्टगणेश अथवा अष्टगणपती न म्हणता अष्ट’विनायक’ म्हणून संबोधले जाते यातही त्यांची प्राचीनता दिसून येते.

सतराव्या शतकात जिजाबाई आणि शिवाजी महाराज कसबे पुणे येथे वास्तव्याला आले. त्यावेळी मुरार जगदेवाने उद्ध्वस्थ केलेल्या पुण्याची पुनर्रचना करताना त्यांनी लालमहालामागे गणपतीचे मंदिर उभारले आणि हा कसबा गणपती पुण्याचे ग्रामदैवत बनला. अठराव्या शतकात नानासाहेब पेशव्यांनी पुण्यात उभारलेल्या मंदिरांमध्ये शंकराची मंदिरेच अधिक होती. शनिवारवाड्याच्या एका दरवाज्यापाशी छोट्याशा देवळात स्थापन केलेल्या गणपतीमुळेच त्याला गणेश दरवाजा म्हणत असत. त्याकाळी शनिवारवाड्यात अनेकदा दिल्लीदरवाज्यापेक्षा गणेशदरवाज्यातूनच प्रवेश केला जात असे. त्यावरून दरवाज्यातील या गणेशाचे महत्व लक्षात येते. दिल्लीदरवाज्यातून प्रवेश केल्यावर समोरील भिंतीवरही गणपतीचे भव्य चित्र रंगवलेले होते. तसेच शनिवारवाड्यातील गणपतीरंगमहालात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत असे.  माधवराव पेशवे हे गणपतीचे भक्त असल्यामुळे त्यांच्या काळात थेऊर, रांजणगाव इत्यादी गणपती मंदिरांचे महत्व वाढले. याच काळात इतर सरदारांनी देखील आपापल्या प्रांतात गणेशमंदिरे उभारली होती तर राघोबादादांचे पुत्र अमृतराव पेशवे यांनी वाराणसीला गंगेच्या घाटावर अमृत-विनायक गणेश मंदिर उभारले होते.   

पेशवेदफ्तरातील नोंदींवरून अठराव्या शतकात पुण्यात शंकराची चाळीस तर गणपतीची छत्तीस मंदिरे होती असे लक्षात येते. त्यांत गोसाव्याच्या समाधीमंदिरातील शक्तिसह असलेला वैशिष्ट्यपूर्ण त्रिशुंड गणपती, सारसबागेतील गणपती, इत्यादी मंदिरे होती आणि विविध व्यक्तींच्या घराजवळ असलेली उदा. नागोजी गुंडयाच्या घराजवळचा गणपती, मोदीच्या घराजवळचा गणपती, भिकारीदास याच्या बागेतील गणपती इ. मंदिरेही होती.  

पुणे परिसरात निर्माण झालेली ही विविध गणेशमंदिरे बघताना गणेशाच्या गेल्या दोन हजार वर्षांतील देवताविकासाचा विचार केला तर त्यांचा अन्वयार्थ लावता येतो.