दिल्लीतला मराठमोळा गणेशोत्सव

मीना हेजीब, नवी दिल्ली
पुणे : महाराष्ट्राबरोबरच दिल्लीतही गुरुवारी गणपत्ती बाप्पाचे जल्लोषात, उत्साहात स्वागत झाले. गेल्या चाळीस वर्षांपासून दिल्लीतील मराठी माणसे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या सहभागातून साजरा करण्यात येणारा हा उत्सव दिल्लीकरांसाठी देखील आकर्षण ठरतो आहे.प्रशासकीय सेवा, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये वास्तव्यास गेलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी चाळीस वर्षांपूर्वी सांस्कृतिक समिती स्थापन केली. हळूहळू महाराष्ट्राचे सण समारंभ दिल्लीमध्ये साजरे करण्यास सुरुवात झाली. रामकृष्ण हेजीब म्हणजेच आर. एम याउत्साही नेतृत्वामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळाली. या संस्थेच्या कार्याचा नियोजनबद्ध विस्तार करण्यासाठी वसंतराव साठे यांनी सार्वजनिक उत्सव समिती स्थापन केली. या छोट्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला असून, दिल्लीतील मराठी माणसांसाठी वर्षभर वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. कार्यक्रमांमुळे दिल्लीत विखुरलेली मराठमोळी मंडळी आवर्जून एकत्र येत आहेत.संस्थेच्या कार्यक्रमांमधील महत्वाचा एक उपक्रम म्हणजे गणेशोत्सव. दिल्लीहटमध्ये आम्ही ‘महाराष्ट्र महोत्सव’ हा दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानांची रेलचेल असते. पुणे, मुंबई, नागूपर अशा विविध भागातून कलाकार या व्यासपीठावर कला सादरीकरणासाठी येतात. दररोज दोनशे ते अडीशे लोकांची हजेरी असते. दिल्लीतील मराठी माणसांचाही या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळतो. एवढेच नव्हे महाराष्ट्रातील राजकीय नेते, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही आवर्जून उपस्थिती असते.महाराष्ट्रामध्ये जसे गणपतीचे जल्लोषात स्वागत झाले, तसेच स्वागत गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही दिल्लीवासी मराठी बांधवांनी दिल्लीहटमध्ये केले. या वर्षी ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘बायको माझी लय भारी’ ही दोन व्यावसायिक नाटके, ‘भावस्पर्श गाणी’, ‘साजिरी मराठी’, ‘सुरमयी शाम’ असे विविध कार्यक्रम होणार आहेत. गणशोत्सवाबरोबरच आम्ही वर्षभरात मराठी भाषा दिन, वसंत साठे स्मृती दिन, कोजागिरी कार्यक्रमयशवंतराव चव्हाण स्मृती कार्यक्रम आयोजित करतो. प्रत्येक कार्यक्रमाला साडे तीनशे ते चारशे लोकांची हजेरी असते. सार्वजनिक उत्सव समितीमुळे येथील मराठी बांधवांचा स्नेह जुळला आहे. समिती म्हणजे कुटुंब झाले आहे. (लेखिका दिल्लीतील सार्वजनिक उत्सवमंडळाच्या अध्यक्ष आहेत.)

(शब्दांकन: चैत्राली चांदोरकर)