कंबोडिया येथील गणेश

Cambodia

व्हिएत्नामप्रमाणे कंबोडिया येथेही प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसून येतो॰ येथे साधारणतः इसवीसनाच्या ५व्या शतकापासून भारतीय संस्कृतीचे अवशेष सापडतात॰ कंबोडिया येथील अंगकोरवटया प्रसिद्ध मंदिरवशेशांमुळे येथील भारतीय संस्कृतीचे विशेष महत्व आहे॰  येथेही हरीहर शिव दुर्गा विष्णू गणेश स्कंद इत्यादी हिंदू देवतांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत॰ येथेही मंदिरांच्या आवारात मंदिरस्थापनेचे शिलालेख सापडतात॰

 

येथील मंदिरात आग्नेय आशियात आढळणाऱ्या बसलेल्या गणेश मुर्तीन्सारखी गणेशाची मूर्ती सापडते॰ अंकोर थोमयेथे मिळालेली एक गणेशमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे॰ कंबोडियातील बायोन शैलीची हि मूर्ती १२ व्या अथवा १३व्या शतकातील असावी असा संशोधकांचा कयास आहे॰

 

हि चतुर्भुज गणेशाची मूर्ती एका छोट्या पीठावर पद्मासनात बसलेली असून तिचे पुढचे दोन्ही हात गुढग्यांवर ठेवलेले आहेत॰ त्याचे मागचे दोन्ही हात सध्या तुटलेले आहेत॰ गणपतीच्या डोक्यावर अर्धमुकुट असून त्यातून त्याचा जटाभार दिसत आहे॰ या गणेशाच्या गळ्यात यज्ञोपवीत घातले आहे तसेक त्याच्या दंडावर नागबंधन आहे॰ त्याने ज्याला कंबोडियातील स्थानिक स्थानिक भाषेत सम्पोत म्हणतात ते चुणीदार कटीवस्त्र परिधान केले आहे॰ हे कटीवस्त्र त्याने बयोन शैलीत नेहेमी आढळणाऱ्या छोट्या कंबरपट्याने बांधले आहे॰ या गणेशमूर्तीच्या पीठाच्या घडणीशैलीवरून हे शिल्प येथील राजा जयवर्मन ७वा याच्या काळात निर्माण झाले असावे॰ हि मूर्ती ८२ सेमी उंचीची आहे॰

 

फ्नोम पेन्ह येथील राष्ट्रीय संग्रहालयात कंबोडियामध्ये सापडलेल्या विविध गणेशमूर्ती प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत॰ दक्षिण कंबोडिया येथे सापडलेली ७व्या शतकातील द्विभुज गणेशमूर्ती तसेच एक उभी असलेली चतुर्भुज गणेशमूर्ती या संग्रहालयात आहे॰

 

येथेच एक मोठी व अतिशय सुंदर अशी प्रासाद बाक येथील १०व्या शतकातील मूर्ती मेबॉन येथील चतुर्भुज गणेशाची १०व्या शतकातील मूर्ती बस्सक येथील ११व्या शतकातील मूर्ती देखील प्रदर्शित केल्या आहेत॰

 

विएतनाम असो किंवा कंबोडिया असो भारतीय संस्कृती आणि त्याच्या संकल्पना तिथे अजूनही रुजलेल्या आपल्याला दिसतात॰ तसेच विष्णू शिव स्कंद ब्रह्मा गणेश इत्यादी भारतीय देवतांच्या द्विभुज चतुर्भुज मूर्ती मूळच्या भारतीय रुढी परंपरा कायम ठेवून तेथील स्थानिक कलाकारांनी स्थानिक शैलीत निर्माण केल्या इतकेच नाही तर विविध प्रदेशातील व विविध काळातील स्वतंत्र शिल्पशैलीही रूढ केल्या व त्यांचा प्रसार पुढील इतर देशामध्ये केला॰