सध्याच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाल, चीन, जपान, म्यानमार, मलेशिया, व्हिएत्नाम, कंबोडिया, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये गणेशप्रतिमा प्राचीन काळात व मध्ययुगात पोचल्या होत्या असे तेथील पुराव्यांवरून आढळते॰इन्डोनेशियाच्या पूर्वेला असणाऱ्या बोर्निओ बेटावरही गणेशाच्या मूर्ती आढळून आल्या आहेत॰ हा भारतीय गणेशप्रतिमेच्या प्रवासाचा अतिपुर्वेकडील पुरावा आहे॰
आग्नेय आशियात ज्या द्वीपसमूहाला आज आपण इंडोनेशिया म्हणून ओळखतो त्यातील जावा व बाली द्वीपांवर आजही भारतीय संस्कृती जपली गेली आहे॰इंडोनेशियाच्या कागदी चलनावरही एका गणेशमूर्तीचे अंकन केले आहे॰
जावा व बाली येथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव इसवीसनाच्या ५व्या शतकापासून सुरु झालेला दिसून येतो॰नंतर इसवीसनाच्या ८व्या, ९व्या शतकात शैलेंद्र राजांचे राज्य तिथे होते॰प्रंबनान येथील मंदिरे व बोरोबुदूर येथील स्तूप येथील वेभवशाली शिल्पकलेची साक्ष देतात॰ तर येथील मंदिरांमध्ये इंद्र, हरीहर, शिव, भैरव, महिषासुरमर्दिनी, ब्रह्मा,गणेश,कार्तिकेय इत्यादी देवतांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत॰
इंडोनेशियामध्ये शंकरानंतर विशेष लोकप्रिय असलेली देवता म्हणजे गणपती॰येथे प्राचीन काळातील गणेशाची मंदिरेआढळत नाहीत॰ परंतु प्राचीन शिवमंन्दिरांमध्ये कोनाड्यात गणेशप्रतिमा आढळतात॰ काही डच अधिकार्यांना १९३५ मध्ये बोरोबुदूर भागात बयोन येथे एक विटांचे शिवमंदिर सापडले॰स्थानिक भाषेत येथे मंदिराला चंडी असे म्हणतात॰ या चंडीबयोन येथील ५ प्रतिमा नंतर जाकार्ता येथील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आल्या॰ या प्रतिमांमध्ये एक गणेशाची सुंदर प्रतिमा आहे॰जवळजवळ दीड मीटर उंचीची हि गणेशाची प्रतिमा या संग्रहालयातील एक प्रमुख आकर्षण आहे॰
हि दगडी गणेशप्रतिमा कमलासनावर बसलेली आहे॰इंडोनेशियात इतरत्र आढळणाऱ्या चतुर्भूज गणेशमुर्तीन्प्रमानेच हि मूर्तीदेखील पायाचे तळवे समोरासमोर ठेवलेली आहे॰या मूर्तीच्या मस्तकामागे प्रभावलय दाखविले आहे॰ मूर्तीच्या मस्तकावर अर्धमुकुट असून त्यातून गणेशाचा जटासंभार दिसत आहेत॰ मूर्तीच्या गळ्यात कंठा असून नागयज्ञोपवीत देखील घातले आहे॰ या एकदंत चतुर्भुज गणेशाच्या हातांत दात, अक्षमाला, परशु व मोदकाची वाटीआहे॰ गणपतीच्या चुणीदार वस्त्रावर फुलांची नक्षी आहे॰ अत्यंत सुंदर व बारीक नक्षीकाम या मूर्तीवर करण्यात आलेले आहे॰ संशोधकांच्या मते ८व्या ते १०व्या शतकात निर्माण झालेली हि मूर्ती म्हणजे इंडोनेशियातील शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे॰
कदाचित यामुळेच जाकार्ता येथील राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देणार्यांमध्ये हि गणेशाची भव्य मूर्ती लोकप्रिय आहे॰इतकेच नाही तर इंडोनेशियाच्या २०००० रुपयाच्या कागदी चलनावर याच गणेशमूर्तीला स्थान मिळाले आहे॰ गणेशाला इंडोनेशियामध्ये ज्ञानाचा अधिपती मानत असल्यामुळे बांडुंग येथील तंत्रज्ञान केंद्राच्या चिन्हावरही हि गणेशप्रतिमा आढळते॰